संजय राऊत म्हणतात, ज्यांच्या कॉलरला हात घालायचा आहे तो घातला जाईलच, पण..

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । ‘महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. नक्कीच काही गोष्टी आहेत, पण काही तांत्रिक बाबी लक्षात घ्याव्या लागतात.केंद्रीय यंत्रणांप्रमाणे सूडाच्या भावनेने इथे कारवाया केल्या जात नाहीत. योग्यवेळी ज्यांच्या कॉलरला हात घालायचा आहे अशा राजकीय गुन्हेगारांच्या कॉलरला हात घातला जाईलच, पण कायद्यानेच’, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारची भूमिका स्पष्ट केली.

गृहमंत्र्यांवर नाराजीच्या वृत्तासंदर्भात संजय राऊत यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी आपले मत मांडले. ‘मुख्यमंत्र्यांनी स्वत: स्पष्ट केले आहे की, माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे, ते उत्तम काम करताहेत, तेव्हा अशा अफावा विरोधी पक्षाकडून पसरवल्या जात आहेत, त्या निरर्थक आहेत. आमचं तीन पक्षांचं सरकार व्यवस्थित सुरू आहे आणि ते सुरू राहणार आहे’, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

‘भाजप नेते मुनगंटीवार म्हणाले की राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पद पाहिजे, शिवसेनेला गृहमंत्री पद पाहिजे. हे तुम्ही कोण ठरवणार? तुमच्याकडे कुणाला विरोधीपक्ष नेते पद पाहिजे हे आम्ही सांगतो का?’ असा टोलाही त्यांनी लगावला.

‘या फुसुकल्या सोडण्याचं काम जे भाजपकडून सुरू आहे त्यामुळे वातावरण कलुशुती होईल असं त्यांना वाटतं आहे. पण असं काहीही होणार नाही. तिन्ही पक्षांचा, संपूर्ण कॅबिनेटचा एकमेकांवर विश्वास आहे’, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘काही कारवाया, पाऊले उचलली जात आहेत, मुख्यमंत्री त्यात लक्ष घालत आहेत. मात्र राजकीय सूडाने कारवाया करायच्या नाहीत यालाच कायद्याचे राज्य म्हणातात. ठाकरे सरकार हे कायद्याचे राज्य चालवते आहे. बेकायदेशीपणे कोणतीही कारवाई होणार नाही’, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांकडे गृहखातं असावं त्यामुळे राज्य शकट हाकण्यास मदत होते. मात्र हे एक पक्षाचे सरकार नाही. तीन पक्ष आहेत. हे हातात हात घालून काम करताहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं.