संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल : आम्ही शिमगा करायला सुरूवात केली तर

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । भाजपला (BJP) कोणीही घाबरत नाही, पुढच्या पाच वर्षातही आम्ही सत्तेत येणार आहोत असे सांगत भाजपातील आमचे मित्र रोज नव्या तारखा सांगुन रंग उधळत आहेत, हे सर्व रंग नकली असून त्यावर केंद्राचीही बंदी आहे. होळी वर्षातून एकदा येते पण यांचा रोज शिमगा सुरू आहे. आम्ही शिमगा करायला सुरूवात केली तर महाराष्ट्रातही खूप खड्डे खणले आहेत आणि त्यात कोण पडेल, कोणाला ढकललं जाईल हे दिसेल असा थेट इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला. (Sanjay Raut’s strong attack on BJP, if we start doing Shimga)

महाराष्ट्रात भाजप विरूध्द महाविकास आघाडी सरकार हा संघर्ष गंभीर वळणावर आला आहे. रोज दोन्हीकडून गंभीर आरोप होत आहेत. भाजपकडून सरकारवर पाडण्याच्या घोषणा सतत होत आहेत, केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर धाड सत्र राबवले जात आहे. सरकारमधील दोन मंत्री ईडीच्या कोठडीत आहेत. आता आणखी दोन मंत्र्यांविरोधात छापेमारी सुरू झाली आहे यामुळे भाजप विरूध्द महाविकास आघाडी हा संघर्ष अधिकच चिघळत चालला आहे. या सर्व घडामोडीनंतर शिवसेना अधिक आक्रमक होऊ लागली आहे.

आक्रमक झालेल्या शिवसेनेकडून भाजपविरूध्द मोठी मोहिम राबवली जाणार असल्याचे संकेत संजय राऊत यांनी दिले आहेत. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, शिवसेना मोठा पक्ष आहे, शिवसेनेचे आव्हान आहे. ज्याचे आव्हान असते त्याच्याविरोधात बोंब मारली जाते. भाजपच्या दंडात ताकद आहे, असे त्यांना वाटत असते. पण तसे नाही. कारण ते पाठीमागून वार करतात. राजकारणात पाठीमागून होणारे हल्ले पचवायचे असतात आणि आम्ही ते पचवत आहोत. ठाकरे सरकारला अडीच वर्ष झाली असून अजून अडीच जातील आणि पुढील पाच वर्षे पुन्हा आम्हीच सत्तेत येणार, असेही संजय राऊत म्हणाले.

राऊत पुढे म्हणाले की , भाजपला पुन्हा सत्तेत न येऊ देण्याच्या शरद पवार यांच्या विधानाला समर्थन करत यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. शरद पवार यांनी जो विश्वास दिला आहे की, घाबरु नका मी भाजपा पुन्हा महाराष्ट्रात येऊ देणार नाही ही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस नाही तर महाविकास आघाडीच्या वतीनेही त्यांनी भूमिका मांडली आहे, असे संजय राऊत म्हणाले.