सायकल चालवत जामखेडचा शिवसैनिक धडकला थेट मातोश्रीवर, 400 किलोमीटर प्रवास करुन उध्दव ठाकरेंना भेटलेला तो तरुण कोण ? वाचा सविस्तर
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्रात मागील महिनाभरापासून राजकीय उलथापालथ सुरू आहे. शिवसेनेत बंडखोरी झाल्याने शिवसेनेत उभी फूट पडली आहे. उध्दव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे ही लढाई आता निर्णायक वळणावर आली आहे. शिवसेना कोणाची हा वाद पेटला आहे. अश्यातच बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षावर आणि कुटुंबावर आलेल्या संकटाचे पडसाद राज्यात उमटत आहेत. ठाकरेप्रेमी जनता उध्दव ठाकरेंच्या पाठीशी एकवटू लागली आहे. अश्यातच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याप्रती असलेल्या निष्ठेचे जगावेेगळे उदाहरण आता समोर आले आहे.
राज्यात शिवसेनेचा एक एक गड ढासळत असताना निष्ठावंत शिवसैनिक मात्र उध्दव ठाकरेंसोबत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक उध्दव ठाकरेंना भेटण्यासाठी मुंबईत दाखल होत आहेत. साहेब आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत तुम्ही फक्त लढा, गद्दारांना धडा शिकवू असा विश्वास ठाकरेंना देत आहेत. असाच एक निष्ठावंत शिवसैनिक आता चर्चेत आला आहे. जो 400 किलोमीटर सायकल चालवत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर धडकला. त्याचं नाव मायकल साळुंके हे होय.
मायकल साळुंके हा अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड शहरातील तरुण. शिवसेनेत उफाळून आलेल्या बंडखोरीने अस्वस्थ झाला. शिवसेनेतील एका गटाने हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्राला सत्तेतून पायउतार केले शिवाय तो गट थेट शिवसेनेवर दावा करु लागलाय. आपले उध्दव साहेब आता एकटे पडलेत. आपण साहेबांना भेटले पाहिजे, साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हे सांगितलं पाहिजे, पण सांगणार कसं ? साहेबांपर्यंत आपला आवाज कसा पोहणार ? या प्रश्नांनी मनात काहूर माजवलेले असतानाच त्याने मनाशी पक्का निर्धार केला. मुंबई गाठायची आणि आपल्या उध्दव साहेबांना भेटायचा. मग जायचं कसं हा प्रश्न आला. त्यावर सायकल हे उत्तर मिळाले. आणि त्याने मुंबईच्या दिशेनं कुच केली.
दि 22 रोजी मायकल साळुंके हा तरूण सायकलवर मुंबईच्या दिशेनं निघाला. जामखेड ते मुंबई साधारणता: 350 ते 400 किलोमीटरचे अंतर त्याने चार दिवसांत पार केले. पावसाची तमा न बाळगता त्याने मातोश्री गाठली. मातोश्रींच्या बाहेर एक दिवस थांबला. जामखेडहून 350 ते 400 किलोमीटर सायकल चालवत एक तरुण आपल्याला भेटायला आलाय ही वार्ता शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना समजताच मायकल साळुंके या तरुणाला सन्मानाने मातोश्रीत बोलावण्यात आले.
यावेळी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मायकल साळुंके याची विचारपूस केली. संवाद साधला. मायकलने आपल्या मनातील भावना उध्दव ठाकरेंना सांगितल्या. एव्हाना कोणीतरी एक तरूण शिवसैनिक 350 ते 400 किलोमीटर सायकल चालवत उध्दव ठाकरेंना भेटायला आलाय ही गोष्ट माध्यमांना समजली. माध्यमांनी त्याची मुलाखत घेतली आणि शिवसेनेचा मायकल राज्यात चर्चेत आला.
कोण आहे मायकल साळुंके ?
मायकल साळुंके हा जामखेड शहरातील तरुण आहे. भटक्या समाजातील या तरुणाची कौटुंबिक परिस्थिती अतिशय गरिबीची आहे. मिळेल ते काम करून जगणारं हे कुटुंब आहे.मायकलच्या कुटुंबात आई वडील, तीन भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे.मायकलचे शिक्षणही फारसे झालेले नाही. मायकलला लहानपणापासून बाळासाहेब ठाकरे फार आवडतात. शिवसेनेत निर्माण झालेल्या दुफळीमुळे दुखावलेला मायकल बाळासाहेबांच्या प्रेमापोटी मातोश्रीवर उध्दव ठाकरेंना भेटण्यासाठी सायकल चालवत गेला. एखादा नेता आपल्याला मनापासून आवडत असेल आणि तो नेता अडचणीत असेल तर त्या नेत्याला पाठबळ देण्यासाठी मायकल सारखे ध्येयवेडे तरूण उभे राहतात हाच मायकल साळुंके या तरुणाच्या कृतीतून निघणारा संदेश स्वार्थी राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा ठरत आहे.