जामखेड टाइम्स वृत्तसेवा । राज्यातील सत्तांतरानंतर माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे विरूद्ध उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगताना दिसू लागला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिशन मुंबई महापालिका हाती घेतले आहे. यावरून उध्दव ठाकरे हे सुध्दा आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. ठाकरे यांनी फडणवीस यांना समाचार घेताना जोरदार हल्लाबोल केला आहे. (Uddhav Thackeray attack on Fadnavis)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत भाषण करताना आपल्याला बाळासाहेबांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेत सत्ता मिळवायची आहे म्हणत त्यांच्या नावाने मते मागायचा केविलवाणा प्रयत्न केला.त्यांच्या या वक्तव्यामुळे आता मोदींच्या नावाने मते मागून उपयोग होणार नाही हेच एकप्रकारे अधोरेखित केले आणि मोदी पर्व संपल्याचीच ही नांदी, कबुली आहे,” असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली.
“भाजपच्या धोरणानुसार वापर संपला की नवीन नाव शोधायचे आणि त्यांच्या नावाने मते मागायची आणि आपली सत्तेची तळी भरायची असाच हा प्रकार आहे. या निमित्ताने भाजपचा खरा चेहरा देवेंद्र फडणवीस यांनी समोर आणला. महाराष्ट्रातील जनता याना मतपेटीतून याचं उत्तर देईलच,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
“जे स्वप्न मुंबईकरांच्या मनातील मुंबईकरीता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी बघितलं होतं ते स्वप्न पूर्ण करायचे ही जबाबदारी आपली आहे. कारण त्यांचं नाव सांगून जे निवडून आले त्यांनी त्यांचं स्वप्न धुळीस मिळवले. ते स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत, ते इतके आत्ममग्न होते, इतके आत्मकेंद्रीत होते की, स्वतःच्या पलीकडे ते पाहू शकले नाहीत. मुंबईकराकडे त्यांनी कधीही बघितले नाही. आता मुंबईकरांसाठी काम करणाऱ्यांना आपण निवडून आणायचे आहे आणि मुंबईकरांनी जे स्वप्न पाहिले आहे, जे स्वप्न वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी पाहिले आहे, ते पूण करण्याचे काम आता आपल्याला करायचे आहे त्यासाठी कामाला लागा,” असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.