जामखेड टाइम्स वृत्तसेवा । राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. सुप्रीम कोर्टात या दोन्ही गटाचा वाद गेल्याने खरी शिवसेना कोणाची याचा अजून फसला होणे बाकी आहे. त्यातच आता शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कारवाईचा भडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेतील दोन बंडखोर नेत्यांची त्यांनी हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दीड – दोन महिन्यापूर्वी शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले होते. शिंदे गटाने आम्ही शिवसेनेतच असून आम्हीच खरी शिवसेना असा दावा केला. यामुळे शिवसेनेतच उद्धव ठाकरे गटविरुद्ध शिंदे गट अशी उभी फूट पडली. खरी शिवसेना कोणाची ? यावरून तसेच पक्षांतर बंदी कायदा संदर्भामध्ये दोन्ही गटाकडून सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आल्या.यावर निर्णय येणे अजूून बाकी आहे. अशातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे ॲक्शन मोडवर आल्याचे दिसत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये सहभागी झालेले मंत्री उदय सामंत आणि यशवंत जाधव या दोन बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतला आहे.अशी घोषणा करण्यात आली आहे. शिवसेनेत उफाळून आलेल्या बंडखोरीनंतर बंडखोरांना पक्षाबाहेर काढण्याचा सपाटा शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांनी लावला आहे. त्याचाच भाग म्हणून आता सामंत आणि जाधव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
शिवसेनेतील तब्बल 40 आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी केली त्यानंतर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक माजी आमदारांनी तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेतील अनेक मातब्बर नेते शिंदे यांच्या गटात दाखल होत असल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
एकीकडे शिवसेनेतील मातब्बर नेते ठाकरे गटाला सोडून जात असतानाच पक्षाला उभारी देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनेचे प्रमुख माजी मंत्री आदित्य ठाकरे हे निष्ठावंत शिवसैनिकां च्या बळावर पक्ष संघटना नव्याने बांधण्यासाठी सक्रिय झाल्याचे दिसत आहे.
ज्या बंडखोरांनी अजूनही शिवसेना सोडली नाही अशा बंडखोरांविरोधात आता कारवाईचा बडगा उगारण्याचे धोरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हाती घेतले आहे. त्यानुसारच त्यांनी आता मंत्री उदय सामंत आणि यशवंत जाधव या मोठ्या नेत्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे उद्धव ठाकरे गटविरुद्ध शिंदे गट हा संघर्ष आता अधिक उफाळताना दिसणार आहे.