जामखेड टाइम्स वृत्तसेवा : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. तसेच शिंदे यांच्याकडे असलेल्या आमदारांच्या संख्याबळानुसार ठाकरे सरकार अल्पमतात आले आहे. नाराज शिंदेंच्या मनधरणीसाठी शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. परंतु त्यात अजुनही यश आलेलं नाही.
मंत्री एकनाथ शिंदेंसोबतची सुरतमधील बैठक आटोपून मिलिंद नार्वेकर मुंबईच्या दिशेने निघाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान शिंदेंच्या मनधरणीसाठी रश्मी ठाकरे यांनी शिंदेंशी फोनद्वारे संपर्क केल्याची माहिती समोर येत आहे.
शिवसेनेत नाराज असलेले मंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जात आहे. तसंच, आदित्य ठाकरेंना पक्षात दिलं जात असलेलं जास्तीचं महत्त्वही त्यांना रुचत नसल्याचं एक कारण सांगितलं जात आहे.
एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या भेटीत काय घडलं? तुम्ही तुमचं ठरवा, मी माझं ठरवतो
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज आहेत, त्यांची ही तणावाची स्थिती काही काळापासून होती; मात्र अशा प्रकारे त्याचा स्फोट होईल, असा अंदाज शिवसैनिकांसह महाविकास आघाडी मधल्या अनेकांना नव्हता. कारण दोनच दिवसांपूर्वी शिवसेनेच्या 56 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेतल्या अन्य नेत्यांसमवेत उपस्थित होते. परंतू या कार्यक्रमात त्यांनी भाषण केले नव्हते.
महाविकास आघाडी सरकार पडणार का ? शरद पवार काय म्हणाले ?
तसंच, गेल्या आठवड्यात आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा बहुचर्चित अयोध्या दौरा झाला, त्यातही एकनाथ शिंदे सहभागी झाले होते; पण सूत्रांच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्र्यांसोबत (CM Uddhav Thackeray) त्यांचा संवाद फारसा होत नव्हता. त्यांना पक्षात फ्रस्ट्रेशन आल्यासारखं वाटत होतं. संवादात असलेल्या या दरीचा फायदा भारतीय जनता पक्षाने बरोबर करून घेतला अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
सूत्रांनी असाही दावा केला आहे, की ज्या नागरी विकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाचे शिंदे हे मंत्री आहेत, त्याचा कारभारही त्यांना स्वतंत्रपणे चालवू दिला जात नव्हता. त्यांच्या मंत्रालयातल्या सगळ्या घडामोडींवर मुख्यमंत्री कार्यालयाचं सातत्याने आणि बारकाईने लक्ष असे. तसंच, महत्त्वाच्या सर्व निर्णयांना मुख्यमंत्री कार्यालयाची परवानगी पहिल्यांदा घ्यावी लागे. काही जण असाही आरोप करतात, की आदित्य ठाकरे शिंदे यांच्या मंत्रालयांच्या कारभारात हस्तक्षेप करत होते.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर रोहित पवार यांची मोठी प्रतिक्रिया
एकनाथ शिंदे हे ज्येष्ठ नेते असून, याआधी देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) नेतृत्वाखालच्या सरकारमध्येही शिंदेंनी मंत्रिपद सांभाळलं होतं. फडणवीस यांच्याशी शिंदे यांचे चांगले संबंध असून, ते आत्ता भाजपला अनुकूल ठरल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेत असलेलं गैरव्यवस्थापन, तसंच आघाडीमध्ये संजय राऊत यांचा शब्द अंतिम मानला जाणं या गोष्टींना एकनाथ शिंदे वैतागले असावेत, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
आम्हाला सुरतमधून बाहेर काढा, बंडखोर आमदारांचा उध्दव ठाकरेंना फोन, राजकीय घडामोडींना वेग
शिंदेंचे समर्थक, तसंच पक्षातल्या अनेकांनी सांगितलं, की शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सहकार्य करत नाहीत, अशा तक्रारी शिवसेना आमदारांनी केल्या होत्या. तसंच, उद्धव ठाकरेही त्यांना भेटत नव्हते. त्यामुळे अधिकच फूट पडत गेली. तसेेच पक्षातल्या अन्य एका वरिष्ठ नेत्याकडून अन्य आमदारांसमोर अपमान केला गेल्यामुळे शिंदे दुखावले गेले होते अशीही चर्चा रंगली आहे.
स्थानिक निवडणुका स्वबळावर लढल्या जाव्यात, असं मत शिंदेंनी व्यक्त केलं होतं. शिवसेना स्वतःच्याच पक्षकार्यकर्त्यांचा आदर करत नसल्याची भावनाही त्यांच्या मनात घर करून राहिली होती. त्या सगळ्यावर कडी म्हणून की काय, विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीची जबाबदारी युवा सेनेच्या दोन नेत्यांसह संजय राऊत यांच्याकडे देण्यात आली होती.
मंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया आली समोर, एकनाथ शिंदे म्हणतात आम्ही सत्तेसाठी कधीही…
उद्धव ठाकरेंकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. याचा परिणाम विधान परिषद निवडणुकीवरही झाल्याचं दिसून आलं. शिवसेनेच्या मतदारांनी क्रॉस व्होटिंग केल्यामुळे भाजपला या निवडणुकीत मोठा विजय मिळाला आणि त्यांचे पाचही उमेदवार निवडून आले.
एकनाथ शिंदे हे मोठा जनाधार असलेले नेते मानले जातात. अशा या ज्येष्ठ नेत्याच्या कामात सारखी ढवळाढवळ आणि हस्तक्षेप, तसंच मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख, तसंच त्यांच्या कुटुंबीयांकडून केलं जाणारं दुर्लक्ष यांमुळे त्यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात टोकाचं पाऊल उचललं असावं, असा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला आहे.
आमदार राम शिंदे उद्या कर्जत – जामखेडमध्ये होणार दाखल, असा असेल दौरा
काँग्रेसमधल्या (Congress) एका ज्येष्ठ नेत्याने आपलं नाव गुप्त राखण्याची अटीवर काही माहिती दिली. ‘2019 साली जेव्हा अशी घोषणा करण्यात आली, तेव्हा एकनाथ शिंदेंचं नाव सर्वांत आघाडीवर होतं. संजय राऊत आणि सुभाष देसाई या नेत्यांनी सुचवलं, की शिंदेंपेक्षा उद्धव ठाकरे हाच मुख्यमंत्रिपदासाठी अधिक चांगला पर्याय आहे. त्यानंतर उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री झाले. तेव्हा साहजिकच एकनाथ शिंदे दुखावले गेले.
विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीची जबाबदारी संजय राऊत यांच्याकडे देणं ही यावरची कडी होती. शिंदे यांचा सरकार पाडण्याचा प्लॅन आहे, की ते शिवसेनेसोबत चर्चा करून त्यांचं पुढचं धोरण ठरवतील, याची आम्हाला कल्पना नाही,’ असं या नेत्याने सांगितलं.
मोठी बातमी : करुणा शर्मांना पुण्यात अटक
त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून शिंदे हे भाजपसोबत पुन्हा युती करा असा आग्रह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करत होते, मात्र शिंदे यांच्या मागणीला पक्षनेतृत्वाने फारसे गांभीर्याने घेतले नव्हते. मात्र आता विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे हे आपल्या समर्थक आमदारांसह भाजपच्या ऑपरेशन लोटसचा भाग बनल्याचे चित्र आज दिवसभरात समोर आले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात येत्या काही दिवसात काय होणार याची उत्सुकता राज्याला लागली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात राजकीय भूकंप, भाजपच्या नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश !