Raj Thackeray vs Sambhaji Brigade argument erupted | राज साहेब तुम्ही प्रबोधनकारांचे नातू आहात की पुरंदरेंचे ? संभाजी ब्रिगेडचा थेट सवाल!
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे गेल्या काही दिवसांपासून संभाजी ब्रिगेड व मनसेत वादाची ठिणगी पडली आहे.आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक व सांस्कृतिक क्षितिजावर पेटलेला हा वाद आता टोकदार होऊ लागला आहे. संभाजी ब्रिगेडने राज ठाकरेंच्या दुखर्या नसेवर बोट ठेवत राज साहेब तुम्ही प्रबोधनकार ठाकरेंचे नातू आहात की पुरंदरेंचे? असा थेट सवाल विचारल्याने मनसे व संभाजी ब्रिगेड यांच्यातील वाद आता वेगळ्या वळणावर आला आहे. (Raj Saheb, are you the grandson of Prabodhankar Thackeray or Purandare? As the Sambhaji Brigade asked such a direct question to Raj Thackeray, the dispute between the MNS and the Sambhaji Brigade has now taken a different turn.)
संभाजी ब्रिगेडचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष गोरख दळवी यांनी १८ ऑगस्ट रोजी यासंदर्भात एक प्रसिध्दी पत्रक काढत राज ठाकरेंना थेट सवाल केला आहे. या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांनी त्यांच्या साहित्यातून महाराष्ट्राचे प्रबोधन केले आहे. त्यांच्या रंगो बापूजी नावाच्या चाळीस पानाच्या पुस्तकात बाबासाहेब पुरंदरे यांची सर्व चालकी उघड केली आहे. स्वर्गि बाळासाहेब ठाकरे यांनी देखील हे कसले शाहीर हा तर सोंगाड्या आहे असे विधान बाबासाहेब पुरंदरेंसंदर्भात केले होते. जेम्स लेनच्या नावाखाली जिजाऊंची व शिवरायांची बदनामी करणारे हेच ते पुरंदरे आहेत. पुरंदरेंचा लैच पुळका आला असेल तर आधी तुम्ही प्रबोधनकारांचे नातू आहात की पुरंदरची ते एकदा स्पष्ट करावे असे थेट अव्हान संभाजी ब्रिगेडने राज ठाकरे यांना दिले आहे.
गुजरात व नागपुरच्या मालकाला खूश करण्यासाठी हे धंदे
महाराष्ट्रात आगामी निवडणुकीमध्ये मनसेला भाजप सोबत युती करायची असल्याने गुजरातच्या व नागपूरच्या मालकाला खूश करण्याचे धंदे राज ठाकरे यांच्याकडून सुरू आहेत असा टोला संभाजी ब्रिगेडने लगावला आहे.
आम्हाला खळखट्याक शिकवू नका : संभाजी ब्रिगेडचा इशारा
आम्हीच भांडारकर, वाघ्या, दादोजी कोंडदेव, सुदर्शनला फोडले,गडकरीचा पुतळा जमीनदोस्त केला होता. त्यामुळे संभाजी ब्रिगेडला खळखट्याक शिकवायची गरज नाही असाही इशारा प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आला आहे.
कोणतेही असंवेदनशील विधान कराल तर याद राखा
शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेब व प्रवीण दादा गायकवाड हे बहूजन मराठा समाजाचे मार्गदर्शक व दिशादर्शक आहेत. त्यांच्या बाबतीमध्ये कोणतेही असंवेदनशील विधान यापुढे खपवून घेतले जाणार नाही असा इशारा अहमदनगर मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गोरख दळवी, अवधूत पवार, पोपटराव चेमटे, कैलास वागस्कर, नवनाथ मोरे, माणिकराव वागस्कर, प्रताप शिंदे, सागर जाधव, राजूभाऊ लोटके आदींनी दिला आहे
मनसे विरूद्ध संभाजी ब्रिगेड वादात महाविकास आघाडी अलगद अडकली
फडणवीस सरकारने पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला. त्या पुरस्काराला देशभरातील साहित्यीक अभ्यासक, दोन्ही छत्रपती तसेच प्रत्येक क्षेत्रातील लोकांनी, शिवप्रेमींनी, अनेक संघटनांनी विरोध केला होता. तरीही फडणवीस सरकारने खुर्चीचा व सत्तेच्या बळाचा वापर करत पुरस्कार दिला त्यामुळे पुरस्काराची किमंत कमी केली असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला असुन महाविकास आघाडी सरकारने पुरंदरेंचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत घ्यावा’, अशीही मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. या मागणीमुळे मनसे विरूद्ध संभाजी ब्रिगेड वादात महाविकास आघाडी अलगद अडकली आहे. या वादात महाविकास आघाडी नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
आता मनसेच्या भूमिकेकडे लक्ष
संभाजी ब्रिगेडच्या या सर्व आरोपांवर आणि प्रश्नांवर राज ठाकरे, त्यांचे नेते आणि ठाकरे सरकार काय प्रत्युत्तर देणार? याकडे लक्ष महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
मनसे व संभाजी ब्रिगेड यांच्यातील वाद नेमका कश्यामुळे ?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या ९९ व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला नुकतीच पुण्यात हजेरी लावली होती. याचदरम्यान त्यांनी जाती व्यवस्थेवरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसवर निशाणा साधला होता. त्यानंतर संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांनी राज ठाकरे यांना पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही, ते पुरंदरेंच्या ब्राह्मणी वर्चस्वाच्या विचारणसरणीला जवळ करत आहेत. असा आरोप करत राज ठाकरेंवर तोफ डागली होती. त्यानंतर इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनीही राज ठाकरे यांच्यावर टिका केली होती. त्यानंतर चवताळलेल्या मनसेकडून गायकवाड व कोकाटे यांच्याविरोधात गरळ ओकत टीकास्त्र सोडण्यात आले होते. यावर आक्रमक झालेल्या संभाजी ब्रिगेडने राज ठाकरे यांच्यावर आक्रमक टिका करण्याचा धडाका लावला आहे. यामुळे संभाजी बिग्रेड विरुद्ध मनसे आमने-सामने आले आहेत आहेत.