स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर, राजु शेट्टींची मोठी घोषणा

कोल्हापूर, दि 5 एप्रिल, जामखेड टाईम्स वृत्तसेवा । स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तशी घोषणा स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात केली. राजु शेट्टी यांच्या रूपाने महाविकास आघाडीतील खदखद बाहेर पडली. स्वाभिमानीच्या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

राजू शेट्टी गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत नाराज असल्याची चर्चा रंगली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडणार अशी चर्चा रंगली होती. अखेर आज शेट्टी यांनी महाविकास आघाडी सोबतचे सर्व संबंध संपल्याचे जाहीर केले. कोल्हापुरात पार पडलेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

यावेळी आपली भूमिका मांडताना राजू शेट्टी म्हणाले की, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सरकार आलं होतं असं साताऱ्यातील सभेत शरद पवार यांनी भिजत-भिजत सांगितलं होतं. पवारसाहेब पावसात भिजले, पण त्यात राज्यभरातील शेतकरी विरघळून गेला, अशी टीका केली.

स्वत:च्या मनगटाच्या बळावर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ

आजवर दिल्लीवाल्यांनी फसवलं, आता मुंबईवाल्यांनीही फसवलं. त्यामुळं येणाऱ्या काळात पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या बांधावर जाऊ आणि स्वत:च्या मनगटाच्या बळावर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ, असा निर्धार शेट्टी यांनी यावेळी बोलून दाखवला.

आम्ही कुणाच्या मागे लागलो नाही

आम्ही कधी एनडीएच्या मागे लागलो नाही आणि महाविकास आघाडीच्याही मागे लागलो नाही. एनडीएसोबत यावं यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी विनंती केली आणि महाविकास आघाडी सोबत यावं म्हणून शरद पवारांनी विनंती केली, असंही शेट्टी यांनी यावेळी स्पष्ट केलं.

मग याचा तपास का होत नाही?

रोज ईडीच्या चौकशी बद्दल ऐकतोय, माझं ईडीच्या (ED) प्रमुखांना सांगणं आहे. विमा कंपन्या शेतकऱ्यांना हजारो कोटींचा चुना लावत आहेत. त्याचे पुरावे आणि तक्रारी मी केली आहे. मग याचा तपास का होत नाही? असा सवालही शेट्टी यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला.