जामखेड तालुक्याला मिळणार हक्काचे पाणी, जलसंपदा विभागाने कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून मागवला अहवाल !
कृष्णा भिमा स्थिरीकरण योजनेत जामखेड तालुक्याचा समावेश करा – आमदार प्रा.राम शिंदे यांची सरकारकडे मागणी
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कृष्णा भिमा स्थिरीकरण योजनेत जामखेड तालुक्याचा समावेश व्हावा यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा हाती घेतला आहे. याबाबत आमदार शिंदे यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मागणी केली आहे. आमदार शिंदे यांच्या या मागणीमुळे जामखेड तालुक्यातील जनतेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
कायम दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या जामखेड तालुक्यात सिंचनाची मोठी सोय नाही. तालुक्यातील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. तालुक्यात मोठा सिंचन प्रकल्प नाही. दुष्काळग्रस्त भागाला कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था व्हावी याकरिता तालुक्याच्या हक्काचे पाणी मिळावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढा सुरु आहे. कुकडीचे पाणी जामखेड तालुक्याला मिळावे ही गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे. तालुक्यात पाट पाण्याची व्यवस्था निर्माण व्हावी व जामखेड तालुक्याच्या हक्काच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आमदार प्रा राम शिंदे पुढाकार घेतला आहे. आमदार शिंदे यांनी कृष्णा भिमा स्थिरीकरण योजनेत जामखेड तालुक्याचा समावेश करावा अशी मागणी सरकारकडे केली आहे.
आमदार प्रा राम शिंदे यांनी १९/०५/२०२४ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कृष्णा भिमा स्थिरीकरण योजनेत जामखेड तालुक्याचा समावेश करावा अशी मागणी केली आहे. या पत्रावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपासून अहवाल सादर करावा असे निर्देश देताच जलसंपदा विभागाने ६ जून २०२४ रोजी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना एक पत्र लिहले आहे. महामंडळाने आमदार प्रा.राम शिंदे यांनी केलेल्या मागणीनुसार मुद्देनिहाय स्वयंस्पष्ट अहवाल सादर करावा असे या पत्रात म्हटले आहे. कृष्णा भिमा स्थिरीकरण योजनेत जामखेड तालुक्याचा समावेश होण्यासंदर्भात आता शासकीय पातळीवर हालचाली वाढल्यामुळे जामखेड तालुक्यातील जनतेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
कोल्हापूर सांगली भागात दरवर्षी कृष्णा व इतर नद्यांना मोठा पुर येतो. पुराचे वाहून जाणारे पाणी वाया जाते. याच पाण्यातून दुष्काळग्रस्त भागाला पाईपलाईनद्वारे पाणी देण्याची कृष्णा भिमा स्थिरीकरण योजना सरकारने आखली आहे. या योजनेतून मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागाला पाणी दिले जाणार आहे. यातील पहिला प्रकल्प बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघात राबवला जाणार आहे. यासाठी सरकारने कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सदरचे काम वेगाने सुरु आहे.
आष्टी मतदारसंघात जाणारे पाणी कर्जत व जामखेड तालुक्यातून जाणार आहे. कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्याचा समावेश कृष्णा खोऱ्यात होतो. जामखेड तालुका हक्काच्या पाण्यापासून वंचित आहे. जामखेड तालुक्यावर झालेला अन्याय दुर व्हावा यकरिता कृष्णा भिमा स्थिरीकरण योजनेत जामखेड तालुक्याचा समावेश व्हावा अशी मागणी आमदार प्रा.राम शिंदे यांनी महायुती सरकारकडे केली आहे.
आमदार प्रा.राम शिंदे यांच्या मागणीनुसार जलसंपदा विभागाने महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाला जामखेड तालुक्याचा कृष्णा भिमा स्थिरीकरण योजनेत समावेश व्हावा याबाबत तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. जामखेड तालुक्यातील जनतेचे गेल्या अनेक वर्षांची मागणी आता मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आमदार प्रा राम शिंदे यांची ही मागणी यशस्वी झाल्यास दुष्काळग्रस्त जामखेड तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाण्याचा कायम स्वरूपी दुष्काळ मिटणार आहे.
“दुष्काळग्रस्त भागाला पाणी देण्यासाठी राज्याचे जलसंपदामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून कृष्णा भीमा स्थिरीकरण ही महत्वाकांक्षी योजना महायुती सरकारने हाती घेतली आहे. या योजनेतून पुराचे वाहून जाणारे पाणी पाइपलाइनद्वारे मराठवाड्याला दिले जाणार आहे. सदर योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पात जामखेड तालुक्याचा समावेश व्हावा यासाठी माझा सरकारकडे पाठपुरावा सुरु आहे. त्यादृष्टीने जलसंपदा विभागाने महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून अहवाल मागवला आहे. जामखेड तालुक्यातील जनतेची गेल्या अनेक वर्षांची मागणी महायुती सरकार कृष्णा भिमा स्थिरीकरण योजनेच्या माध्यमांतून पुर्ण करेल आणि जामखेड तालुक्याला हक्काचे पाणी मिळेल असा ठाम विश्वास आमदार प्रा राम शिंदे यांनी व्यक्त केला आहे.”