जामखेड टाइम्स वृत्तसेवा : अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथून तीन लाख रूपये किमतीचा 21 किलो गांजा जप्त (21 kg Ganja seized) करण्यात आला आहे. या प्रकरणात एकास अटक करण्याची कारवाई शिर्डी पोलिसांनी (Shirdi Police) केली आहे. ही कारवाई डिवायएसपी संदिप मिटके (Shirdi DYSP Sandip Mitake) यांच्या पथकाने पार पाडली.
साईबाबा मंदिरामुळे शिर्डीचा जगभर नावलौकिक आहे. याच शिर्डीत अवैध्य धंद्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झालेला आहे. शिर्डीतील हेलिपॅड रोडवरील एका वस्तीवर गांजाचा मोठ्या प्रमाणात साठा असल्याची बातमी मिळाल्यानंतर शिर्डी पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली. या धाडीत तीन लाख रूपये किमतीचा 21 किलो गांजा जप्त करण्याची कारवाई करण्यात आली.
शिर्डी येथील चांगदेव कोते हा इसम गांजा विक्री करत असून त्याच्या वस्तीवर एका खोलीत मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिसांनी चांगदेव कोते याच्या मालकीच्या खोलीत 3 लाख रूपये किमतीचा 21 किलो गांजा, वजन काटा, प्लास्टिक पिशव्या, कटर सह आदी साहित्य जप्त केले. पोलिसांनी आरोपी चांगदेव कोते याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील इतर आरोपी दत्तात्रय बाबुराव करपे, अनिता दत्तात्रय करपे व शुभम दत्तात्रय करपे या तिघांचा पोलिस वेगाने शोध घेत आहेत.
शिर्डी पोलिस स्टेशनला आरोपी चांगदेव कोते, दत्तात्रय बाबुराव करपे, अनिता दत्तात्रय करपे व शुभम दत्तात्रय करपे या चौघांविरुद्ध NDPS कायदा कलम 20 ब नुसार गुन्हा दाखल केला आहे. सदरची कारवाई डिवायएसपी संदिप मिटके, पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या पथकाने पार पाडली. या कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.