जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्रात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाले आहे. या सरकारमध्ये मंत्रीपदावर कोणाची वर्णी लागणार याचीच उत्सुकता आता राज्याला लागली आहे. मंत्रीपदावर आपली वर्णी लागावी यासाठी भाजप आणि शिंदे गटातील आमदारांची मोर्चेबांधणी सुरू आहे. नव्या मंत्रिमंडळाची निवड करताना भाजपकडून पुन्हा एकदा धक्का तंत्राचा वापर केला जाणार असल्याचे बोलले जात आहे.
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषद निकालाच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारत सुरत गााली होती.त्यानंतर शिंदे गटाने आपला मुक्काम गुवाहाटीला हलवला होता. तब्बल दहा दिवसांच्या या सत्ता संघर्षामध्ये शिवसेनेतील 39 आमदारांनी बंडखोरी करत शिंदे गटात उडी घेतली होती, तर काही अपक्षांनीही शिंदे गटाला पाठिंबा दिला होता.
शिवसेनेकडून हे बंड शमवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न झाले, मात्र शिवसेनेला यश आले नाही. दरम्यान महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपालांनी दिल्यानंतर हा वाद कोर्टात गेला. कोर्टाने ठाकरे सरकारला दिलासा दिला नाही त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार सत्तेतून बाहेर झाले.
त्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाने सरकार स्थापनेचा दवा केला आणि राज्यात नवे सरकार स्थापन झाले. या सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री बनले. शिवसेनेतील बंडखोरी मागे भाजपचा हात असल्याचे सातत्याने शिवसेनेच्या नेत्यांकडून बोलले जात होते. त्यामुळे राज्यात देवेंद्र फडवणीस हे मुख्यमंत्री होतील आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील अशी अपेक्षा होती, मात्र भाजपने धक्का तंत्राचा अवलंब केला आणि मुख्यमंत्रीपद शिवसेनेच्या बंडखोर गटाकडे दिले.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य स्थापन झालेल्या नव्या सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी मिळावी, यासाठी भाजप आणि शिंदे गटातील आमदारांनी जोरदार मोर्चेबांधणी हाती घेतली आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या शिवसेनेच्या बंडखोर मंत्र्यांना नव्या सरकारमध्ये चांगली खाती हवी आहेत. याशिवाय भाजपातील अनेक उतावळ्या आमदारांनाही मंत्रीपदाचे वेध लागले आहेत.
बंडखोर आमदारांनी पुन्हा शिवसेनेची वाट धरू नये यासाठी शिंदे सरकारमध्ये बंडखोर आमदारांना जास्तीचे मंत्रिपदे देण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर भाजपकडून सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राम शिंदे, प्रवीण दरेकर, आशिष शेलार यांची वर्णी जवळपास निश्चित आहे.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपकडून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता अधिक आहे.
शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक असलेले राम कदम, प्रसाद लाड, गोपीचंद पडळकर, नितेश राणे या आमदारांना मंत्रिमंडळात संधी दिली जाणार नसल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा आहे.दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील हे दोन्ही नेते मंत्रिमंडळात समावेश व्हावा यासाठी प्रयत्नशील आहेत या दोन्ही नेत्यांच्या अनुभवाचा फायदा मंत्रिमंडळाला व्हावा अशी काहींची इच्छा आहे मात्र या दोन्ही नेत्यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशावर मात्र अनिश्चितता असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान शिवसेनेच्या बंडखोर गटात सहभागी असलेले आमदार बच्चू कडू हे मंत्रीपदावरून नाराज असल्याची चर्चा आह. बच्चू कडू यांना महत्त्वाचे खाते हवे आहे.त्याचबरोबर बंडखोर गटातील अनेक आमदार मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत, त्यामुळे कुणाची मंत्रिमंडळात वर्णी लावायची हा पेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढवणारा ठरू शकतो. या सर्व घडामोडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कसा मार्ग काढतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
असे असले तरी राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश होणाऱ्या मंत्र्यांची अधिकृत यादी जोपर्यंत भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जाहीर करीत नाहीत तोवर सध्या तरी चर्चांचा गुर्हाळ मात्र जोरात सुरू आहे. नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाच्या निर्मितीमध्ये भाजपकडून धक्कातंत्राचा अवलंब केला जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कोणाची लॉटरी लागणार आणि कोणाला धक्का बसणार हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
दरम्यान कालपासून सोशल मीडियावर एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाची यादी जोरदार व्हायरल झाली आहे.या यादीमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची नावे आहेत. मात्र जोपर्यंत मंत्र्यांचा शपथविधी होत नाही, तोपर्यंत मात्र राज्याच्या राजकारणात शिंदे सरकारमध्ये कोण मंत्री होणार याचीच चर्चा जोरदारपणे चर्चिली जाणार हे मात्र निश्चित!
दरम्यान विश्वास दर्शक ठराव जिंकल्यानंतर शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पाच जुलै रोजी होऊ शकतो अशी माहिती आता समोर येत आहे. त्यामुळे मंत्रिमंडळामध्ये समावेश व्हावा यासाठी इच्छुक आमदारांनी जोरदार मोर्चे बांधणी हाती घेतली आहे. एकुणच राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे.