World Cup Qualifiers 2023 : नेदरलँड्सने सुपर ओव्हरमध्ये माजी विश्वविजेत्या वेस्ट इंडिजला चारल पराभवाची धुळ !
World Cup Qualifiers 2023 : भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषक 2023 (CWC 2023) स्पर्धेसाठी क्वालिफायर सामने सुरू आहेत. 26 जून रोजी 18 वा सामना पार पडला. वेस्ट इंडीज विरूध्द नेदरलॅंड (WI vs NED) या दोन संघात अतिशय रोमहर्षक सामना पार पडला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात नेदरलॅंडला निर्धारित षटकात 373 धावांचं लक्ष्य गाठता आलं नाही. सामना टाय झाला. मात्र सुपर ओव्हरमध्ये नेदरलॅंडने चमत्कार घडवत वेस्ट इंडिजचा पराभव केला. (icc world cup qualifiers 2023 netherlands beats former world champion west indies in super over)
आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेच्या क्वालिफायरच्या 18 व्या सामन्यात मोठा उलटफेर पहायला मिळाला. वेस्ट इंडीज संघाने नेदरलॅंडला 373 धावांचं लक्ष्य दिलं होतं. शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या या सामन्यात सामना बरोबरीत सुटला. यावेळी पार पडलेल्या सुपर ओव्हरमध्ये नेदरलॅंडचा फलंदाज लोगन व्हॅन बीक याने तडाखेबंद फटकेबाजी करत एका षटकात 30 धावा वसूल केला. यात त्याने 3 षटकार अन 3 चौकार लगावले. वेस्ट इंडीजला हे लक्ष्य पार करता आले नाही. अवघ्या 8 धावा करता आल्या. सुपर ओव्हरमध्ये नेदरलॅंडने वेस्ट इंडीजला पराभवाची धुळ चारत दिमाखदार विजय मिळवला.
WI vs NED मॅचच्या शेवटच्या ओव्हरमध्ये काय घडलं ?
नेदरलँड (Netherlands) संघाला विजयासाठी अखेरच्या षटकात 9 धावांची गरज होती. वेस्ट इंडिज (West Indies) संघाकडून हे षटक अल्झारी जोसेफ टाकत होता. जोसेफच्या पहिल्या चेंडूवर लोगन व्हॅन बीक (Logan Van Beek) याने चौकार मारला. या चौकारासह नेदरलँडच्या आशा वाढल्या होत्या. अखेरच्या 5 चेंडूत 5 धावांची गरज होती. मात्र, जोसेफने पुढील पाचही चेंडूत दोन विकेट्स घेत फक्त 4 धावा खर्च केल्या. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला.
सुपर ओव्हरमध्ये लोगन व्हॅन बीकची धमाल
सुपर ओव्हरमध्ये वेस्ट इंडिज संघाकडून जेसन होल्डर (Jason Holder) गोलंदाजी करत होता. नेदरलँडकडून पुन्हा एकदा लोगन स्ट्राईकवर होता. त्याने यावेळी धमाल केली. होल्डरने टाकलेल्या पहिल्या चेंडूवर लोगनने चौकार मारला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि चौथ्या चेंडूवर पुन्हा एक षटकार मारला. अशाप्रकारे 4 चेंडूत 20 धावा झाल्या होत्या. त्यानंतर षटकातील पाचव्या चेंडूवरही लोगनने षटकार मारला आणि अखेरचा चेंडू चौकारासाठी पाठवत सुपर ओव्हरचा शेवट केला.
गोलंदाजही चमकले
या षटकातून एकूण 30 धावा आल्या. आता वेस्ट इंडिजला विजयासाठी 31 धावांची गरज होती. त्यांच्याकडून जॉनसन चार्ल्स याने षटकार मारत चांगली सुरुवात केली. मात्र, बॅटमधून धमाल करणाऱ्या लोगन याने पुढील दोन चेंडूंवर फक्त दोन धावा खर्च केल्या. चौथ्या षटकात चार्ल्सने मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात विकेट गमावली. तसेच, पुढच्या चेंडूवर होल्डरही तंबूत परतला. अशाप्रकारे वनडे क्रिकेट इतिहासातील तिसऱ्या सुपर ओव्हरमध्ये नेदरलँड संघाने बाजी मारली.
वेस्ट इंडिज संघाने उभारलेला 374 धावांचा डोंगर
तत्पूर्वी वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजी करताना 6 विकेट्स गमावत 374 धावा केल्या होत्या. यावेळी संघाकडून निकोलस पूरन याने शानदार फलंदाजी करताना 65 चेंडूत नाबाद 104 धावा करत शतक झळकावले होते. यामध्ये 6 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश होता.
वेस्ट इंडिजच्या या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँड संघाकडून तेजा निदामानुरू याने शानदार फलंदाजी करत 76 चेंडूत 111 धावा केल्या. यामध्ये 3 षटकार आणि 11 चौकारांचा समावेश होता. तसेच, लोगन याने अखेरच्या षटकांमध्ये 14 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 28 धावा कुटल्या. यामुळे नेदरलँड संघानेही 50 षटकात 9 विकेट्स गमावत 374 धावा केल्या होत्या. मात्र, सुपर ओव्हरमध्ये धमाल कामगिरी करत नेदरलँड विजय मिळवण्यात यशस्वी झाला.