ICC World Cup 2023 : आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी 12 शहरांची निवड, अंतिम सामना होणार नरेंद्र मोदी स्टेडियमवर तर सेमीफायनल होणार या मैदानावर !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : ICC World Cup 2023 : संपुर्ण क्रिकेट विश्व ज्या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहतं, ती आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा यंदा भारतात होणार आहे.स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच पाकिस्तान विरूध्द भारत यांचे कुठे होणार यावरून वाद रंगलेला आहे.अश्यातच विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी 12 शहरांची निवड करण्यात आली आहे.(ODI World Cup 2023 venue in India) या स्पर्धेचा विजेतेपदाचा अंतिम सामना नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम, अहमदाबाद (Narendra Modi Cricket Stadium Ahmedabad) या ठिकाणी खेळवला जाणार आहे.
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2023 भारतात होणार आहे. ही स्पर्धा 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या काळात होणार आहे. ही स्पर्धा 12 मैदानावर खेळवली जाणार आहे. यातील फायनल मॅच अहमदाबाद येथे खेळवली जाणार आहे. तर सेमी फायनलचे सामने कोलकाता येथील ईडन गार्डन व मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत.
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2023 चे सामने मुंबई, पुणे, अहमदाबाद, दिल्ली, बंगलोर, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, धर्मशाळा, लखनऊ, थिरूअनंतपुरम, गुवाहाटी या 12 शहरांमध्ये स्टेडियमवर खेळवले जाणार आहे.विजेतेपदाचा अंतिम सामना नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम, अहमदाबाद येथे खेळवला जाणार आहे, असे वृत्त ANI या वृत्तसंस्थेने दिले आहे.
46 दिवसांच्या कालावधीत तीन बाद फेरीसह 48 सामने खेळवले जाणार आहेत. लीग सामने 10 शहरांमध्ये आयोजित केले जाण्याची शक्यता आहे, मुख्य स्पर्धेपूर्वी आणखी दोन शहरांमध्ये सराव सामने आयोजित केले जातील. 10 संघांमध्ये विश्वचषक स्पर्धा होणार आहे.
भारताचे संभाव्य सामने खालील प्रमाणे
भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. यानंतर 11 ऑक्टोबर रोजी भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात दिल्लीत सामना होणार आहे. भारताचा तिसरा सामना पाकिस्तानशी, तर चौथा सामना बांगलादेशविरुद्ध 19 ऑक्टोबरला पुण्यात होणार आहे. 22 ऑक्टोबरला भारताला धरमशाला येथे न्यूझीलंडविरुद्ध सामना खेळायचा आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना 29 ऑक्टोबर रोजी लखनऊमध्ये होणार आहे. 2 नोव्हेंबरला मुंबईत भारताचा क्वालिफायर सामना होईल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना 5 नोव्हेंबर रोजी कोलकात्यात होणार आहे. भारताचा शेवटचा साखळी सामना 11 नोव्हेंबर रोजी बंगळुरू येथे होणार आहे.