मोठी बातमी : रशियाच्या चांद्रयान मोहिमेला बसला मोठा धक्का, Luna-25 बाबत समोर आले सर्वात मोठे अपडेट, नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : भारत आणि रशिया या दोन देशांच्या चंद्र मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले असतानाच रशियाच्या चांद्र मोहिमेला धक्का देणारी मोठी बातमी आता समोर आली आहे. रशियाचे लुना 25 हे अंतराळयान चंद्रावर कोसळल्याचे वृत्त समोर येत आहे. जर्मनीच्या DW न्यूजने याबाबतचे वृत्त दिले आहे.
रशियाचे लुना २५ हे अंतराळ यान अनियंत्रित कक्षेत फिरल्यानंतर चंद्रावर कोसळले, अशी माहिती रशियाची अंतराळ संस्था रोस्कोसमॉसने रविवारी दिली. लुना 25 ही रशियाची ४७ वर्षांतील पहिली चंद्र मोहीम होती. हे अंतराळयान एका अनियंत्रित कक्षेत गेले आणि चंद्राच्या पृष्ठभागाशी टक्कर झाल्यामुळे त्याचे अस्तित्व संपुष्टात आले, असे रोस्कोसमॉस एका निवेदनात म्हटलंय.
Luna-25 हे 21 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणार होते. रशियाचं ‘लुना-25’ हे चांद्रयान-3 च्या दोन दिवस अगोदर म्हणजे येत्या 21 ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरणार होतं. आतापर्यंत चंद्राच्या इक्वेटरवर सर्व मोहिमा झाल्या आहेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर प्रथमच रशिया आणि भारताचं यान सॉफ्ट लँडिंग करणार होतं.रशियाने 10 ऑगस्ट रोजी 1976 मध्ये लुना-24 पाठवले होतं.
त्या मोहिमेनंतर जवळपास पाच दशकांनंतर रशियाने लुना-25 अंतराळात पाठवलं होतं. शनिवारी लूना 25 यानामध्ये काही तांत्रिक अडचण झाल्याचं समोर आलं होतं. चंद्रावर लँडिंगपूर्वी लूनाची चाचणी घेण्यात येत होती. यावेळी हा बिघाड दिसून आला. अशातच आता लुना-25 चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळल्याचं वृत्त समोर येत आहे.
भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेनंतर रशियानेही चांद्र मोहिम हाती घेतली होती. भारताच्या आधी रशियाचे लुना-25 हे अंतराळयान चंद्रावर उतरणार होते. परंतू रशियाचे हे स्वप्न भंगले आहे.
भारताच्या चांद्रयान-3 च्या मोहिमेकडे जगाचे लक्ष
भारताचे चांद्रयान-3 चंद्राच्या अगदी जवळ पोहोचले आहे. चंद्रापासून अवघ्या 25 किलोमीटरवर भारताच्या विक्रम लँडरचा प्रवास सुरू आहे. येत्या 23 ऑगस्ट रोजी भारताचे चांद्रयान चंद्रावर यशस्वीरित्या उतरण्यासाठी सज्ज आहे. तर दुसरीकडे रशियाचे लुना 25 या चांद्रयानात तांत्रिक बिघाड झाल्याने चंद्रावर जायच्या मार्गावरून भरकटले आहे.
भारताची चांद्रयान 3 मोहिम महिनाभरापासून सुरू आहे. चांद्रयानचे चंद्राभोवती अंडाकृती कक्षेत मार्गक्रमण सुरू होते. टप्या टप्प्याने त्याच्या कक्षा बदलण्यात आल्या. 17 ऑगस्ट रोजी चांद्रयान 3 मोहिमेतील सर्वात यशस्वी मोहिम पार पडली. या मोहिमेत प्रोपप्लशन माॅड्यूलपासून विक्रम लॅंडर वेगळे झाले. विक्रम लॅंडरने एकट्याने चंद्राभोवती प्रवास सुरू केला होता. विक्रम लॅंडर 113 किमी × 157 किमी कक्षेत प्रवास करत होता. आता त्याची कक्षा बदलण्यात आली आहे. विक्रम लॅंडर रेट्रोफिटींग (विरूध्द) दिशेने प्रवास करत आहे.
शनिवारी रात्री विक्रम लॅंडरचे डीबूस्ट करण्यात आले. विक्रम लॅंडर उंची आणि वेग कमी करत चंद्रापासून अवघ्या 25 किलोमीटरवर अंतरावर पोहचले आहे. सध्या विक्रम लॅंडरकडे 150 किलो इंधन शिल्लक असल्याची माहिती, इस्त्रोने जारी केली आहे.
चांद्रयान-3 च्या साॅफ्ट लँडींगची वेळ ठरली
14 जुलै रोजी प्रक्षेपणाच्या वेळी, 1,696.4 किलो इंधन प्रोपल्शन मॉड्यूलमध्ये लोड केले गेले होते. दुसरे आणि अंतिम डीबूस्टिंग ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे आणि त्याचे लँडर खूप कमी कक्षेत आणले गेले आहे. आता मॉड्यूलची अंतर्गत तपासणी केली जाईल आणि नियुक्त केलेल्या लँडिंग साइटवर सूर्यप्रकाशाची प्रतीक्षा केली जाईल, असे इस्त्रोने ट्विट केले आहे. लँडिंगची वेळ 23 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 5.45 वाजता निर्धारित केली आहे.