BJP MLA Suresh Dhas on ED’s radar | भाजपा आमदार सुरेश धस ईडीच्या रडारवर;1000 कोटींच्या इनामी जमीन घोटाळ्याची ईडीकडे तक्रार दाखल !
तक्रारदार आष्टीमधील
जामखेड टाईम्स वृत्तसेवा। BJP MLA Suresh Dhas on ED’s radar | राज्यातील महाविकास आघाडीचे नेता ईडीच्या रडारवर आहेत, रोज कुठे ना कुठे धाड पडते. या सर्वांमागे भाजपचा हात असल्याची टीका महाविकास आघाडीकडून होते.आता भाजपचे आमदार सुरेश धस यांनी 1000 कोटी रूपयांच्या (1000 crore land scam by Suresh Dhas) देवस्थान व वक्फ जमिनी लाटल्याची तक्रार ईडीकडे दाखल झाली आहे. ही तक्रार आष्टीतून दाखल झाली आहे. आमदार सुरेश धस हे ईडीच्या रडारवर (MLA Suresh Dhas on ED’s radar) आल्यामुळे भाजपच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
गेल्या काही वर्षांत बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात मनी लाँड्रिंग प्रक्रिया राबवून इनाम जमिनींचे व्यवहार करण्यात आले आहेत. यात 1 हजार कोटींचा गैरव्यवहार झाला आहे अशी तक्रार सोमवारी मुंबईच्या ईडी कार्यालयात दाखल करण्यात आली आहे.बीड जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते राम खाडे, शेख अब्दुल गनी यांनी ॲड.असीम सरोदे, ॲड.अजित देशपांडे, ॲड.अक्षय देसाई व ॲड. मदन कुर्हे यांच्या मदतीने दाखल केली आहे.
इनामी जमिनी ज्यामध्ये वक्फच्या व देवस्थानच्या जमिनींचा समावेश आहे. अशा अनेक जमिनींचा बेकायदेशीरपणे खरेदी-विक्रीचा व्यवहार माजी मंत्री तथा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या योजनेनुसार त्यांच्यासाठी कार्यरत अनेक माणसांनी केला आहे ,असा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.
हे सगळे व्यवहार करतांना बेहिशेबी रक्कमा फिरवणे, स्वतःच काढलेल्या मच्छिंद्र मल्टीस्टेट कॉ. क्रेडिट बँकेतून मोठ्या रक्कमांचे लोन देणे असे प्रकार घडले आहे.धक्कादायक म्हणजे, ज्यांची आर्थिक पात्रता नाही पण जे आमदार सुरेश धस यांचे खास आहेत अशा आपल्या कार्यकर्त्यांना जमिनी देणे व त्या माध्यमांतून जमिनी बळकावणे असे अनेक व्यवहार हे मनी लाँडरिंग सारखा प्रकार असल्याचे स्पष्ट करणारे आहेत, असे राम खाडे (Ram Khade Ashti) यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
सुरेश धस महसूल राज्यमंत्री असल्यापासून या बेकायदेशीर व्यवहारांसाठी पैसा कसा फिरविण्यात आला व त्याला कशी चालना देण्यात आली, कसे खतपाणी घालण्यात आले ती सगळी प्रक्रिया आष्टी तालुक्यात व बीड जिल्ह्यात झालेल्या काही जमीन व्यवहारांच्या कागदपत्रांवरून स्पष्ट दिसते असे तक्रारदार गनी भाई ( Gani Bhai ) म्हणाले.
एका जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणी त्यांच्यावर आधीच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई यांनी धाड टाकली होती. देवस्थानच्या व मशिदीच्या इनाम जमिनी ह्यामध्ये सुरेश धस यांच्या सांगण्यावरून, पाठबळाने व महसूल खात्याच्या आशिर्वादाने जवळपास १ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे.अनेक जमिनींच्या व्यवहारात शासनाचा महसूल बुडविण्यात आला व सामान्य माणसाची फसवणूक झाली आहे असं तक्रारारदारांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे, या जमिनी हैद्राबाद इनाम निर्मुलन कायद्यानुसार “खिदमतमाश जमीनी” आहेत, त्या विकण्यास कायद्याने परवानगी नाही कारण त्याचे मालक ‘देव किंवा अल्लाह’ आहेत. ज्याला कायद्याच्या भाषेत “लीगल फिक्शन” म्हणतात व त्या इनाम जमिनीचे मूळ भोगवटदार हे फक्त त्या जमिनीचे “विश्वस्त” म्हणजेच ट्रस्टी असतात. विश्वस्तांना जमिनींचे मालक बनवण्याचे काम करण्यासाठी सुरेश धस यांनी संपूर्ण यंत्रणा हाताशी घेतली त्यामुळे हा अनेक लोकांनी मिळून केलेल्या संघटित आर्थिक गुन्हेगारीचा प्रकार आहे, असं तक्रारारदारांचे वकील असिम सरोदे (Advocate Asim Sarode) यांनी म्हटलं आहे.
तत्कालीन प्रभारी उपजिल्हाधिकारी (भु-सुधार) N.R.शेळके यांनी त्या इनाम जमिनी कायदा हातात घेऊन त्या स्वतःच्या जमिनी घोषित करून इनाम जमिनी हे स्टेटस आधी रद्द केले आहे. शेळके हे रजेवर असताना देखील रोजनम्यावर त्यांच्या सह्या आहेत. भु- सुधार अधिकारी शेळके यांना भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात आधीच निलंबित केले आहे व नंतर बडतर्फ सुद्धा केले आहे. तक्रारीसोबत अश्या मनी लॉडरिंग बाबत ईडीला चौकशीचे अधिकार आहे हे दाखविणारे तीन एफ आय आर जोडण्यात आलेले आहेत अशी माहिती तक्रारारदारांनी ईडीला दिली आहे.
भाजपा नेते किरीट सोमय्या हे रोज महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराचे पाढे वाचत असतात. सोमय्यांच्या आरोपांमुळे ईडीने महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर धाडी टाकत कारवाया हाती घेतल्या आहेत. आता भाजपच्या एका आमदाराविरूध्द एक हजार कोटी रूपयांच्या गैरव्यवहाराची तक्रार दाखल झाल्याने याप्रकरणी ईडी काय कारवाई करणार ? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.